सुपे : येथील शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाचा बैलपोळा सणावर दुष्काळी सावट उभे राहिल्याने सुपे (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. ३) भरलेल्या बैलपोळ्याच्या बाजारातील खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच, बैलांची संख्या दिवसेंदिवस घटल्याने येथील उलाढाल मंदावली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.
येथील बाजारात शिर्डी, जामखेड, राहता, पंढरपूर, बार्शी, श्रीरामपूर, घोडेगाव, बीड, जामखेड आदी ठिकाणाहुन विविध छोटे मोठे व्यापारी आले होते. यावेळी बाजारात घुंगर माळ, दृष्ट माळ, कवडी माळ, बकरी पट्टा, सातारी पट्टा, चांगळी पट्टा, वेसन, मोरकी आदी तयार वस्तुंची मागणी शेतकारी वर्ग करीत होता. तर लोकरीचे सर, गोंडे, शेंब्या आदींना चांगली मागणी होती. कातडी वाणात लेझरपट्टा, घागरमाळ, मोरकी तर पितळीवाणात घाटी, घुंगरे, तोडे, शेंबी तसेच बोरकडी आदी वस्तु व्यापाºयांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यावेळी पितळीवाणातील चायणा वस्तुंना जास्त मागणी आसल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. दरवर्षी प्रमाणे सुत, नायलॉन, रेशीम, रेडीमेड माल तसेच चायना वस्तुंच्या किमती मागिल वर्षी सारख्याच असुन थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र जीएसटीमुळे १८ टक्के वाढ झाली असून यावेळी येथील बाजारात दरवर्षीपेक्षा ५० टक्के घट झाली असल्याची माहिती विश्वंभर कासार, रविंद्र कोळपकर, लक्ष्मण दहाते आदी व्यापाºयांनी दिली.