जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमावास्येनिमित्त मोठी यात्रा भरली आहे. राज्यभरातून आलेल्या सुमारे २ लाख भाविकांनी कुलदेवतच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सदानंदाचा येळकोट.. येळकोट जयमल्हार च्या गजरात भाविकांनी सोमवारी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनाला अलोट गर्दी केली. पण खंडेरायालाही भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. त्यांच्या स्नानासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.
सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाल असल्याने सकाळी ८ वाजता पालखी सोहळ्याची कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. पेशव्यांच्या इशारतीने खांदेकरी, मानकरी भाविकांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली, मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले यावेळी गडकोटात मोठ्या प्रमाणावर भांडार खोबऱ्याची उधळण करण्यात येत होती. सोहळ्यातील उपस्थित प्रत्येक भाविक भारावलेल्या अवस्थेत देवाचा जयघोष करीत होता.सोहळा मुख्य नंदी चौकातून शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीने कऱ्हा स्नानासाठी निघाला होता. पालखी मार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी भाविकांची गर्दी होती. भाविक सदानंदाच्या जयघोषात भांडार खोबऱ्याची उधळण करीत देवदर्शन उरकत होते.सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सोहळा कऱ्हे काठी पोहोचला. याठिकाणी विधिवत उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी टँकरने पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.