देऊळगावराजे : सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी एक श्री गणेशाचे श्रद्धास्थान आहे. या तीर्थ क्षेत्राजवळूनच भीमा नदी मार्गस्थ होते. या नदीवर दशक्रियाविधीसाठी अद्ययावत दशक्रियाविधी घाट उभारण्यात आलेला आहे. परंतु नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या भागात दशक्रियाविधी बंद झाले आहे.ज्या ठिकाणी सोईस्कररीत्या पाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन दशक्रियाविधी करण्याची वेळ शोकाकुलांवर आलेली आहे. तसेच रखरखत्या उन्हात त्यातच पाणी नसलेल्या नदीपात्राच्या परिसरात झाडी नसल्यामुळे कावळ््यांनीदेखील नदीकाठ सोडलेला असल्याने याचाही परिणाम दशक्रियाविधीवर होत आहे. सिद्धटेक हे धार्मिक स्थळ असल्याने त्यातच या ठिकाणी पक्षी दशपिंडाला शिवतात, असे जुने जाणकार सांगतात. त्यामुळे हे ठिकाण दशक्रियाविधीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या परिसरात दशक्रियाविधी करण्यासाठी शोकाकुल पुढे येत असतात. साधारणत: महिन्याकाठी १०० च्या जवळपास दशक्रियाविधी होत असतात. मात्र भीमा नदीचे पाणी आटल्यामुळे दशक्रियाविधीची संख्या जवळजवळ पूर्णपणे घटलेली आहे. साधारणत: महिन्याकाठी ५ ते ६ दशक्रियाविधी होत आहेत. नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने हे विधी बंद पडले आहेत. परिणामी स्थानिकांसह अन्य गावांच्या नागरिकाची गैरसोय होत आहे. पंचक्रोशीतील प्रसिद्ध तीर्थस्थळ, भीमा नदीचे मुबलक पाणी, दशक्रियाविधीसाठी स्वतंत्र घाट ग्रामपंचायतीतर्फे केली जाणारी स्वच्छता अशा विविध सोयींमुळे परिसरातील, तसेच दूरवरचे नागरिक दशक्रियाविधी करण्यासाठी येथे येतात. या तीर्थस्थळावर रोज सरासरी तीन ते चार विधी नियमित पार पडत होते. परंतु भीषण दुष्काळी स्थितीमुळे नदीपात्रात पाणीच राहिले नाही. त्यामुळे दशक्रियाविधीवर याचा परिणाम झाला आहे. नदीपात्रात ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जाऊन दशक्रियाविधी करण्याची वेळ शोकाकुलांवर आलेली आहे. (वार्ताहर)हातपाय धुण्याची वेळगेल्या काही महिन्यांपूर्वी भीमा नदीला मुबलक पाणी होते. त्यामुळे दशक्रियाविधी करण्यासाठी आलेल्या शोकाकुलांना अंघोळीसाठी पाणी मिळायचे. परंतु नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. काही ठिकाणी छोट्या -छोट्या डबक्यांमध्ये पाणी साठलेले आहे. या डबक्यातील पाणी बादलीत आणून अंघोळीऐवजी केवळ तोंड हातपाय धुण्याची वेळ शोकाकुलांवर आलेली आहे.
दशक्रियाविधीवर पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: April 12, 2016 4:25 AM