पुणे : पानशेतपासून दहा किलोमीटर अंतरावरील कोशीमघर ( ता. वेल्हा ) मित्रांसोबत लग्नासाठी आलेल्या तरूणाचा गावाशेजारील पानशेत धरणाच्या खोल पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
सोमनाथ जगन्नाथ सुर्यवंशी ( वय, 27 ,सध्या राहणार गोकुळनगर, कात्रज मुळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक ) असे मयत तरूणाचे नाव आहे. सोमनाथ हा आंघोळी साठी पानशेत धरणात गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. असे वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप काहीही तक्रार दाखल केली नाही. या प्रकरणी वेल्हा पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर सोमनाथ याचे पार्थिव त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. काल सोमवारी कोशीमघर येथिल तरुणाचे लग्न होते. त्या लग्नासाठी मयत सोमनाथ सुर्यवंशी हा आदल्या दिवशी रविवारी कोशीमघर येथील मित्र किशोर चंद्रकांत कडू याच्या सोबत पुण्याहून आला होता. सकाळी आंघोळ करण्यासाठी तो कोशीमघर गावाशेजारील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेला होता. त्यावेळी त्याचे मित्र तीरावर होते. खोल पाण्यात सोमनाथ हा बुडू लागला .काही वेळानंतर मित्रांनी पाण्यात धाव घेतली. सोमनाथ याला त्यांनी बाहेर काढले .मात्र नाका तोंडात, पोटात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. पानशेत पोलिस चौकीच्या जवानांसह पोलिस उपनिरीक्षक शशिकांत भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे भोसले यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाने सावधनतेचा इशारा
पानशेत, वरसगाव तसेच खडकवासला धरण व मुठा कालव्यात पोहताना तसेच आंघोळ करताना पर्यटक, विद्यार्थी, तरुणांचे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात खडकवासला येथे मुठा कालव्यात पोहताना बुडून तरुणाचा मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पर्यटक व नागरिकांना पोलीस व खडकवासला जलसंपदा विभागाने सावधनतेचा इशारा दिला आहे.