पुणे : गुरुवारी दिसणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाईपलाईन दुरुस्ती बाजूला ठेवून पाणी द्यावे अशी अजब मागणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पुण्यात केली आहे. त्या पुणे महापालिकेच्या प्रभाग १३मध्ये भाजपतर्फे निवडून आलेल्या नगरसेविका आहेत.
पुणे महापालिकेकडून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता दर महिन्याला देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो.वाढत्या पुणे शहराच्या नागरीकरणामुळे आधीच सर्वत्र पाणी मिळत नाही. अशावेळी अनेकदा पाणी प्रश्नावर सर्वसाधारणसभाही गाजत असतात. त्यावर आंदोलनेही होत असतात. मात्र देखभाल दुरुस्ती बाजूला ठेवून नागरिकांना अंघोळीसाठी पाणी मिळावे अशी काहीशी आश्चर्यकारक मागणी खर्डेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही पत्र देणार असल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या की,' येत्या गुरुवारी (दिनांक २६) रोजी महापालिकेचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.याबाबतची माहिती मी प्रभागातील नागरिकांना कळवली. मात्र त्यांनी ग्रहण आहे, त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे, साठवलेले पाणी ओतून पुन्हा नवे पाणी भरायचे आहे असे सांगितले. पाणी नसेल तर त्यात अडचण येईल असेही नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे पत्र देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख म्हणाले की, 'ग्रहणात पाणी किंवा अन्न खराब होते ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. त्याने कोणतेही नुकसान होत नाही, ग्रहण हे एक वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घेण्याची बाब आहे.धरणातल्या पाण्यावरही सूर्यकिरण पडतात मग तरी ते वापरले जातेच. हे पत्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असून महापालिकेने पाणीपुरवठा सुरु ठेऊ नये. उलट त्यामुळे ग्रहणाच्या अंधश्रद्धेमुळे होणार पाण्याचा अपव्यय टळेल'.