बारामती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे फळबागा, वेलवर्गीय पिकांवर भुरी, मर या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन कृषितज्ज्ञांच्या वतीने केले आहे.जिल्ह्यात सध्या रब्बीच्या ज्वारी, गहू या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तसेच, ९० टक्के द्राक्षबागांमधील द्राक्षकाढणी पूर्ण झाली आहे. त्यामुुळे सध्या केवळ वेलवर्गीय पिके, उर्वरित द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बारामती शहर परिसरात जानेवारीमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. तसेच, जानेवारीतच काही प्रमाणात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. वाढत्या थंडीचा,पावसाचा द्राक्षबागा, भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची टांगती तलवार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला. त्याचाही फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची भीती होती. ढगाळ हवामान, तुरळक पावसामुळे दुपारी १२ पर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. मार्च महिन्यात पंधरवड्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.बारामती, इंदापूर या तालुक्यांत द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास ९० टक्के द्राक्षबागांची काढणी पूर्ण झाली आहे. उर्वरित १० टक्के बागांची काढणी सध्या सुरू आहे. द्राक्षांना दरदेखील सध्या चांगले मिळत आहेत. या १० टक्के बागांमध्ये सध्या पडणाºया ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षीदेखील शेवटच्या महिन्यात ओखी वादळाचा फटका द्राक्षबागांना बसला होता. त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीलाच घसरलेल्या तपमानाची टांगती तलवार द्राक्ष उत्पादक शेतकºयांवर होती.त्यानंतर पुन्हा हवामानबदलाच्या फेºयात द्राक्षबागा अडकल्या आहेत. द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीदेखील भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कडधान्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळिंबबागांवर वाढती थंडी, ढगाळ हवामान व पावसामुळे तेल्या रोगाचे सावट आहे. वातावरणातील या बदलाची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर या पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. बदललेल्या तपमानामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर भुरी, डाउनी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. द्राक्षावर बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक आहे. पिकांची अन्नप्रक्रिया मंदावली आहे. उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका या पिकांचे पोषण कु मकुवत होण्याची भीती आहे. शेतकºयांनी बुरशीनाशक, गंधकाचा वापर करावा. वेलवर्गीय कलिंगड, खरबूज, दोडका यासारख्या पिकांवर ट्रायकोडर्मासारख्या जैविक मित्र बुरशीचा वापर करावा. या काळात पाण्याचे नियोजन पिकांची गरज पाहून करावे. मररोगाला हे पोषक वातावरण आहे. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी फळझाडे, वेलवर्गीय पिकांवर करावी. डॉ. मिलिंद जोशी,कृषिविज्ञान केंद्रप्रमुख
रोगाच्या भीतीने शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:44 AM