पुणे : प्रवाशांच्या संख्येअभावी पुणे-तळेगाव ही रात्री ११ वाजता धावणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या ऐवजी पुणे-लोणावळा अथवा पुणे-मुंबई या गाडीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. पुणे ते लोणावळा या मार्गासाठी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबईकडे जाणा-या फास्ट पॅसेंजर गाडीचा उपयोग प्रवाशांना करता येईल. तसेच मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी आणखी एक लोकल असते. तसेच तळेगाव येथून मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी येणारी गाडी रद्द करण्यात आली होती.लोणावळा येथून पुण्याकडे येणारी लोकल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी तळेगावला येते. त्याचा उपयोग प्रवासी करू शकतात. प्रवाशांना या काळात गाड्या उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून दाट धुक्यामुळे पुणे-लोणावळा रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्याने गाड्यांची गती कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिराने गाड्या धावत असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.दाट धुक्यामुळे मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. या मार्गावरील लोकल गाड्या देखील प्रभावित झाल्या आहेत. धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने सिग्नल देखील दिसू शकत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. उत्तर भारतात देखील दाट धुक्यांमुळे अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे पुण्याहून उत्तर भारतात जाणा-या आणि येणा-या गाड्या देखील उशिराने धावत आहेत.
दाट धुक्यामुळे पुणे-लोणावळा रेल्वे सेवा प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:33 PM