पुणे : कोल्हापूर व सांगलीसह पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणने वर्तविला आहे. पुरामुळे सुमारे चोवीस हजार रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बाधित झाली होती. विद्युत मीटर, रोहित्र, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या आणि उपकरणांच्या नुकसानी बरोबरच विद्युत पुरवठा बंद असल्यामुेळ झालेले महसुली नुकसानही मोठे आहे.कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला होता. पुण्याच्या शहरी भागातील मुठा नदीलगतच्या वस्त्या, सोसायट्या व ग्रामीण भागातही मोठे नुकसान झाले. यासोबतच सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागाला पुराचा मोठा तडाखा बसला. यात लाखो कुटुंबांचे संसार उद्धवस्थ झाले. शेती, छोटे व्यवसाय, उद्योगधंदे बुडाले. हजारो कोटींची वित्तहानी झाली. सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला. हजारो मुकी जनावरेही वाहून गेली. महावितरणचे देखील सुमारे ५२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या यंत्रणेला मोठा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ४५ उपकेंद्राातील ७५० कृषी व बिगरकृषी वीजवाहिन्यांवरील वीजयंत्रणेला फटका बसला. त्यामुळे सुमारे २३,८९० रोहित्रांमधून होणार विद्युत पुरवठा खंडित झाला. तर, त्यातील काही रोहित्रांचा वीज पुरवठा पूरस्थितीमुळे बंद करावा लागला. शहरी व ग्रामीण भागातील सुमारे ४ लाख ५० हजार बिगरकृषी व ३ लाख ४५ हजार कृषी अशा ७ लाख ९५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.सांगली व कोल्हापुरातील विद्युत वितरण सुरळीत करण्यासाठी पुणे, बारामती, सातारा व सोलापूर येथील अभियंता व कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कुशल कर्मचारी यांची ४५ पथके या भागात पाठविली होती. तसेच, इतर परिमंडलातून पॉवर ट्रॉन्सफॉर्मर, रोहित्रे, लोखंडी वीजखांब, वीजवाहिन्या, सिंगल फेज व थ्री फेजचे नवीन मीटर देखील पूरग्रस्त भागात उपलब्ध करुन दिले.पूरस्थिती ओसरल्यानंतर अवघ्या ५ ते सहा दिवसांत शहरी व ग्रामीण भागातील सर्वच ४ लाख ५० हजार बिगरकृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. अनेक पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, बसस्थानके, अग्निशामक दल, तात्पुते पुनर्वसन केंद्रांना प्राधान्याने पयार्यी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. सुमारे २ लाख कृषिपंपाचाही वीजपुरवठा सुरु झाला आहे.--
अतिवृष्टीमुळे महावितरणचे पुणे विभागात सव्वापाचशे कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 2:33 PM
सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागाला पुराचा मोठा तडाखा बसला.
ठळक मुद्देप्राथामिक अंदाज : चोवीस हजार रोहित्र झाली होती बाधित सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे ४० जणांचा मृत्यू