पुणे : काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे भीमा खोऱ्यातील १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत तर चार धरणांमध्ये ९५ ते ९८ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्यातही खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.
पुणे महापालिका व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला ही चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजता खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. मात्र, पावसाचा रोज वाढल्याने हा विसर्ग सायंकाळी ६ वाजता ५,१३६ पर्यंत वाढविण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भीमा खोऱ्यातील वडज, डिंभे, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर भामा आसखेड धरणात ९६.९७ टक्के वडीवळे धरणात ९६.३८ टक्के, कासारसाई धरणात ९८.०१ टक्के, मुळशी ९५.९२ टक्के, चिल्हेवाडी धरणात ९६.३४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. मात्र, उजनी धरण ६८.४८ टक्केच भरले आहे.
----------------------
गेल्यावर्षी खडकवासला धरण परिसरात ८९० मि.मी., पानशेत परिसरात २१६०मि.मी., वरसगाव २,०६० मि.मी., तर टेमघर परिसरात २,७३४ मि.मी., पाऊस झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात पाऊस कमी आहे. त्यामुळेच यंदा धरणे भरण्यास विलंब झाला.
------------------
धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
खडकलवासला - ५,१३६
पानशेत - ३,२९२
वरसगाव - ३,२६५
टेमघर - ३००