पुणे : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून झालेला पाऊस आणि जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाने दिलेली उघडीप यामुळे रविवारी मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात फळभाज्या व पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली. परंतु आवक प्रचंड व मागणी कमी असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांची घट झाली. यामध्ये भेंडी, गवार, दोडका, दुधी, भोपळा, काकडी, कारली, ढोबळी मिरची, शेवगा, घेवडा, मटार, पावटा सर्वच भाज्यांचे दर घटले. तर अन्य भाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.येथील बाजारातून शहराच्या विविध भागांसह कोकणातही मोठ्या प्रमाणात माल पाठविण्यात येतो. मात्र, कोकणात जोरदार पाऊस सुरू असल्याने येथून फळभाज्यांना मागणी घटली आहे.श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे रविवारी (दि. १५) सुमारे २०० ट्रक शेतमालाची आवक झाली. बाजारात दर रविवारी सरासरी १७० ते १८० ट्रक शेतीमालाची आवक होते. आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने पुणे मार्केट यार्ड येथून जाणाऱ्या मालाची मागणीदेखील कमी झाली आहे. याचा परिणाम दरावर झाला असून, फळभाज्या व पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मार्केट यार्डमध्ये परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटक येथून १५-१६ ट्रक मटार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून पाच ते सहा ट्रक कोबी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून तोतापुरी कैरीची ५ ते ६ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून मिळून लसणाची चार ते साडेचार गोणी इतकी आवक झाली.स्थानिक भागातून सातारी आले २२०० पोती, टॉमेटो चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो, काकडी १४ ते १५ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भुईमूग २०० ते २५० पोती, कारली ७ ते ८ टेम्पो, कांद्याची ७० ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ५० ते ५५ ट्रक इतकी आवक झाली.>कोथिंबीर, मेथी ५ रुपये गड्डीपावसामुळे सध्या जिल्ह्यात सर्वच भागांत कोथिंबीर, मेथीसह सर्वच पालेभाज्यांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रविवारी येथील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवकदेखील मोठी होती. परिणामी, कांदापात आणि चुका वगळता बहुतांश पालेभाज्यांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात मेथी, कोथिंबीर आणि अंबाडीच्या भावात शेकडा गड्डीमागे १०० ते २०० रुपयांनी घट झाली आहे. तर, उर्वरित भाज्यांचे भाव स्थिर आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी तरकारी विभागात कोथिंबीची आवक तब्बल २५ हजारांनी वाढ झाली. रविवारी अडीच लाख कोथिंबर गड्डी झाली तर मेथीच्या आवकेत ५० हजारांनी वाढ होऊन आवक १ लाख गड्डी पोहोचली. पावसामुळे भिजलेला आणि खराब माल बाजारात येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ग्राहक असा माल खरेदी करत नाही. त्यामुळे मागणीअभावी पालेभाज्यांचे भाव घसरल्याचे त्यांनी सांगितले.
फळभाज्यांची प्रचंड आवक, पावसामुळे फळभाज्यांची मागणीही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:41 AM