चाकण : कडाचीवाडीत अनाधिकृत प्लॉटिंगचा सुळसुळाट झाला असून प्लॉटधारकांनी आपापल्या जागेत बोअरवेल घेऊन अक्षरशः जमिनीची चाळण केली आहे. अवैधरित्या प्लॉटिंगमध्ये घेतलेल्या बोअरवेलमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर स्थानिक ग्रामपंचायतचे नियंत्रण नाही. याबाबत प्लॉट धारकांवर कारवाई न झाल्यास येथील शेतकरी रवींद्र कड हे खेडचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार करणार आहेत.
कडाचीवाडी गावच्या हद्दीत अनेकांनी अनधिकृतरित्या प्लॉटिंग केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून अनेकांनी एक गुंठ्यापासून ११ गुंठ्यांपर्यंत प्लॉट खरेदी केले आहेत. एकाच ठिकाणी ७२ प्लॉट पाडण्यात आले असून त्या ठिकाणी २० बोअरवेल घेण्यात आले आहेत, तर एका ठिकाणी ९२ प्लॉट पाडण्यात आले असून त्याठिकाणी ५० च्या आसपास बोअरवेल घेण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या विहिरींचे पाणी कमी झाले असून काही विहिरीतील पाणी गायब होण्याचे प्रकार घडले असल्याचे शेतकरी रवींद्र कड यांनी सांगितले. ग्रामपंचायतने यावर नियंत्रण बसावे म्हणून याबाबत ११ गुंठ्यांमागे एक बोअरवेल घेण्याचा ठराव करूनही प्लॉटधारकांनी सरसकट बोअरवेल घेण्याचा सपाटा लावला असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची बागायत शेती धोक्यात आली आहे.