पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमधील २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून आॅक्टोबर ते मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील रब्बीचे पीक वाया गेले होते; मात्र यंदा आॅक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यातील हवामान चांगले होते. त्यामुळे यंदा तरी अवकाळी पाऊस पडणार नाही, असे चित्र होते; पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक राज्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग दाटून आले आणि प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान माजविले. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला. यामुळे हाती आलेल्या रब्बीच्या पिकावर पाणी फेरले गेले.याबाबत देशमुख म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून, गारपीटही होत आहे. कालपर्यंत आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २८ हजार ८०५ हेक्टरवरील पिके खराब झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बीचा गहू, हरभरा ही पिके आहेत. याचबरोबर केळी, संत्रा, चिकू या फळबागांचे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हा अंदाज प्राथमिक आहे.
अवकाळीने केले २९ हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By admin | Published: March 02, 2016 1:20 AM