पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. बसमध्ये चढत असताना हातातील बांगडी कटरने कापणाऱ्या चोरट्याची कृती ६५ वर्षाच्या महिलेच्या प्रसंगावधनामुळे वेळीच रोखली गेली. चोरटा गजाआड झाला असून, ही घटना बाजीराव रोडवर घडली.
सचिन अशोक गायकवाड (वय ४२, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ६५ वर्षाची ही महिला चिंचवडला राहते. त्या आपल्या नातीबरोबर १६ जुलै रोजी दुपारी लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी आल्या होत्या.
खरेदीनंतर नूमवि शाळेसमोर बसथांब्यावर त्या दुपारी साडेचारच्या सुमारास थांबल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करत असताना चोरटा गायकवाडने कटरच्या सहाय्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी अर्धी कापली. ती हातातून काढण्याचा प्रयत्न करीत असताना या महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी गायकवाडला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे तपास करत आहेत.
----