आसखेड : महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या १९ महिन्यांपासून वेतनवाढ करार रखडला असल्याने कामगारांनी गेल्या दोन दिवसांपासून कंपनीत जेवणाचे डबे न आणता सलग आठ तास काम करून काहीही न खाता अन्नत्याग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिलपासून कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण होणारच, या निर्णयावर कामगार ठाम राहिले आहेत. ‘केहिन फाय’ ही बहुराष्ट्रीय कंपनी २००० सालापासून चाकण येथील औद्योगिक वसाहतीत आहे. पण कामगारांची पगारवाढ गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे. कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट व हलाखीची झाली आहे. पगारवाढ करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापनाने उत्पादनासंदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन युनियनला सादर केले आहे. उत्पादनासंदर्भातील वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्याचे निकष ठरविण्यासाठी बाहेरील प्रमाणित संस्थेकडून कामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. यासंदर्भात युनियनने वारंवार लेखी व तोंडी व्यवस्थापनास कळवूनही आजतागायत वरील बाबींची पूर्तता व्यवस्थापनाकडून करण्यात आली नाही.कामगारांची पगारवाढ न करणाऱ्या केहिन फाय व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड हे येत्या २ एप्रिल २०१७ पासून आमरण उपोषणास बसणार आहेत.यासंदर्भात युनियनने व्यवस्थापनास कळविले असून, या बाबतीत केहिन फाय व्यवस्थापनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन, गेल्या दोन दिवसांपासून उपाशी राहून कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कामगार प्रतिनिधी शंकर गडदे यांनी सांगितले.
कामगारांचा वेतनवाढीसाठी अन्नत्याग
By admin | Published: March 31, 2017 2:40 AM