पुणे : वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र कीटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. कापसावरील बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जहाल कीटनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकºयांना आपले प्राण गमवाले लागले आहे. खरेतर कीटनाशकांच्या फवारणीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजुर रुग्णालयात दाखल होत असल्याचे वृत्त गेल्या दोन महिन्यात सातत्याने येत होते. मात्र, त्याची तीव्रता मळमळणे, उलटी आणि चक्कर अशापुरती मर्यादित होती. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली, याबाबत बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले, सप्टेंबर-आॅक्टोबरची हिट वाढत असतानाच गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटनाशकांची फवारणी करताना हाय प्रेशरचे यंत्र वापरले जात आहे. त्यामुळे एक धुके निर्माण झाल्यासारखे होते. असे करताना ना डोळ्यांवर चष्मा घातला जातो, ना तोंड नाक झाकले जाते. कीट नाशकाची फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकणे आवश्यक असते. वेळोवेळी याबाबतचे निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पाऊस असो वा नसो, कीटनाशक वाहून जाऊ नये म्हणून पावसाळ््यात वापरले जाणारा गोंदसारखा पदार्थ देखील फवारला जातो. असे गोंद आणि औषध फवारणाºयाच्या त्वचेला चिकटून राहते. त्वचेतील रंध्रांमार्फत शरीरात झिरपते. औषधाची तीव्रता वाढावी यासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी औषधे एकत्र करुन, त्याची फवारणी केली जाते. त्यामुळे औषधाचा विषारीपणा आणखी वाढतो. असे कीटनाशक श्वसनावाटे, त्वचेवाटे शरीरात जाते. त्यामुळे असा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नेमाडे म्हणाले.
काय घ्यावी दक्षता
- कीटनाशक फवारताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा चष्मा, नाका-तोंडावर मास्क लावावे- कोणत्याही प्रकारची जखम असल्यास कीटनाशक फवारणे टाळावे- किटनाशक फवारल्यावर संपूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय न्याहरी अथवा तंबाखू खाणे टाळावे
बोंडअळीवर कामगंधची मात्राबोंड अळी आटोक्यात आणण्यासाठी जहाल कीट नाशके वापरण्या ऐवजी कामगंध सापळे लावल्यास उपयुक्त ठरते. या सापळ्याकडे नर आकर्षित होऊन मरतो. त्यामुळे अळ्यांचे प्रजनन होत नाही. एकरी असे १० ते १२ सापळे देखील पुरतात. एका सापळ्याची किंमत ३७ ते ४० रुपये आहे. याशिवाय पिवळे आणि निळे चिकट सापळे देखील उपलब्ध आहेत. त्याचा एकरी खर्च केवळ १ हजार रुपये येतो. यात बरोबर निंबोळी अर्क फवारणी देखील यावर उपयुक्त असल्याचे यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी सांगितले.