बारामती : जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढिग, गटारांमध्ये कचरा अडकल्याने ठिकठिकाणी तुंबलेली गटारे त्यामुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी आणि या दुर्गंधीमुळे हैराण झालेले नागरिक ही अवस्था आहे, चंद्रमणीनगर आणि वडारकॉलनीची. बारामतीचा विकास झाला म्हणणाऱ्यांनी या परिसरातून एक फेरफटका मारला तर त्यांनाही नाकाला रुमाल लावावा लागेल, अशीच येथील परिस्थिती आहे. हा परिसर बारामती शहराच्या मध्यभागी येतो. परंतु नगरपालिका प्रशासन या परिसराच्या स्वच्छतेबाबत प्रचंड उदासिन आहे. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतात परंतु सफाईच करत नाहीत, उघड्या गटारींमध्ये परिसरातील कचरा अडकतो त्यामुळे गटारींचे पाणी सारखे तुंबते. तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डासांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे परिणामी संसर्गजन्य आजारांची संख्याही वाढत आहे. जागोजागी सांडपाणी तुंबल्याने परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. ‘परिसरात आलेली नवखी व्यक्ती नाकाला रुमाल लावल्याशिवाय जात नाही. आमच्याकडे कोणी पाहूणा आला तर घरांच्या बाजूने तुंबलेली गटारे आणि दुर्गंधीमुळे तो मुक्कामी राहत नाही. केवळ मते मागायला आमच्याकडे येणारे निवडणुका झाल्यावर मात्र आमच्या अडचणींकडे ढुंकूनही पाहत नाहीत.’ अशी व्यथा येथील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतात मात्र केवळ रहिवाशांनी गाडीत आणून टाकलेला कचराच घेऊन जातात. तुंबलेल्या उघड्या गटारांची साफसफाई होत नाही त्यामुळे येथील नागरिकांनाच गटारांची सफाई करावी लागते. परिसरात लहान मुले या उघड्या गटारांच्या आजूबाजूने खेळतात त्यामुळे मुलांचे आजारी पडणयाचे प्रमाण जास्त आहे. ‘आमची लेकरेबाळे या घाणीमुळे सारखी आजारी पडतात त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार’ असा संतप्त प्रश्नही येथील नागरिक विचारतात. (प्रतिनिधी)
अस्वच्छतेमुळे बारामती शहराला येतोय बकालपणा
By admin | Published: June 13, 2014 5:18 AM