लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट अपेक्षित प्रमाणात ओसरली नसताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदाधिकारी दालनामध्ये राज्यमंत्री आणि बँकेचे संचालक दत्तात्रय भरणे यांनी दरबार सुरू केला आहे. यामुळे सोमवारी (दि. १२) बँकेच्या मुख्यालयात प्रचंड गर्दी झाली. कोरोना संकट असतानाही दालने खच्चून भरली होती. बँकेच्या आवारामध्ये पार्किंगला देखील जागा न उरल्याने वाहतूक कोंडी झाली. सध्या संचालकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवत अशा प्रकारे गर्दी केली जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बीजे रोडवरील मुख्यालय हे कोरोना हॉटस्पॉट ठरलेले आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांचा गेल्या वर्षभरामध्ये मृत्यूदेखील झालेला आहे. असे असताना बँकेच्या इमारतीत लोकांच्या झुंडीच्या झुंडी आणि शिष्टमंडळे आल्याने गर्दी नियंत्रणाचे बँक व्यवस्थापन कोलमडले. राज्यमंत्री भरणे ज्या कक्षामध्ये थांबले होते, त्या कक्षात पाय ठेवायही जागा नव्हती, एवढी गर्दी झाली होती.
इंदापूर आणि दौंड तालुक्यातून सर्वाधिक अभ्यागत बँकेमध्ये आले होते. त्यांचे चहापान करण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. काही संचालकांनी संचालक कक्षाचे दार बंद करून बाहेरील व्यक्तींना प्रवेशापासून थांबून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. बँकेमध्ये असणाऱ्या बैठकांना उपस्थित संचालकांनाही सभाग्रहाकडे जाताना कसरत करावी लागत होती.
जिल्हा बँकेलाच पसंती
मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासाठी बैठका, भेटीगाठी याकरता सर्किट हाऊसमध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु भरणे यांची जिल्हा बँकेलाच पसंती असल्याने त्यांच्या भेटीगाठी शिष्टमंडळे यांची बँकेमध्ये वर्दळ वाढून गर्दी झाली असल्याचे एका संचालकांनी सांगितले.