तळवडे : आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत, परंतु प्रत्यक्ष आधार कार्ड मात्र तयार झाले नाही, ते रद्द झाले असल्याचे चौकशीला गेल्यावर सांगितले जात आहे.तळवडे येथील नितीन भालेकर या तरुणाने आजपर्यंत आधार कार्ड काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत, नितीन याने जवळपास आठ ते नऊ वेळा वेगवेगळ्या आधार केंद्रावरून आपले आधार बनविले आहे, त्याच्याकडे प्रत्येक वेळेस काढलेली नवीन एनरॉलमेंट स्लिप आहे. पहिल्यांदा त्याने आपल्या कुटुंबीयांच्या सोबत आधार कार्ड काढले, कुटुंबातील सर्वांची आधार कार्ड आली. परंतु नितीनचे आधार आलेच नाही. त्यानंतर चौकशी केली असता तुमचे आधार कार्ड रिजेक्ट केले आहे पुन्हा आधार कार्ड बनवा असा सल्ला आधार कार्ड केंद्रातून मिळाला, त्यानंतर नितीन याने सात ते आठ वेळा आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले; परंतु आधार कार्ड आले नाही. तुमच्याकडे हाताचे ठसे जुळत नाहीत, डोळ्यांचे नमुने येत नाहीत, प्रत्येक वेळेस आधार रिजेक्ट होते.आपले आधार का तयार होत नाही यासाठी त्याने नवनवीन आधार केंद्रावर चौकशी केली, त्यानंतर त्याने आधार हेल्पलाईनशी संपर्क केला. प्रत्येक वेळेस सबंधितांनी वेळ मारून नेत नवीन कारण सांगितल्याचा अनुभव नितीनला आला आहे. यासाठी कोणाकडे जावे, काय करावे, आधार क्रमांक मिळणार का, असे प्रश्न पडले आहेत.चुका दुरूस्त करण्यासाठी वणवण--आधार क्रमांक काढताना संबंधित व्यक्तीने नावात चूक केली, वडिलांचे नाव चुकले, आडनाव वेगळे आले. स्पेलिंग चुकीचे आहे. जन्मतारीख चुकली. जन्मतारखेचे केवळ वर्ष टाकले अशा एक ना अनेक चुका आधार कार्डमध्ये झाल्या आहेत.-यामुळे आधार कार्ड असून, त्यातील चुकीमुळे त्याचा उपयोग होत नाही. सदर दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच आधार काढणा-या यंत्रणेच्या कर्मचा-यांचा चुकांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
‘आधार’ नसल्याने तो झाला ‘निराधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:08 AM