पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगामाच धोक्यात आला असून, जिल्ह्यातील सहा हजार दोनशे हेक्टरवरील भाताची रोपे पावसाअभावी करपू लागली आहेत. येत्या दोन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भाताची रोपे जळून जातील व हजारो हेक्टर भातशेती लागवडीशिवाय पडिक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वदूर व चांगल्या पावसाने हजेरी लावली. यामुळे भातउत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सहा-सात तालुक्यांत शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार केल्या. त्यानंतरदेखील अधूनमधून पावसाच्या सरी पडतच होत्या. यामुळे जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर भातरोप वाटिका चांगल्या झाल्या. त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा १७ ते २० जूनदरम्यान बहुतेक पश्चिम पट्ट्यात चांगल्या पावसाची नोंद झाली व भात खाचरातही पाणी आले. यामुळेच जुन्नर, आंबेगाव, खेडसह मावळ, मुळशी तालुक्यांतील पश्चिम पट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी भातलावगड उरकूनदेखील घेतली.
परंतु गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणेच उघडीप दिली आहे. एवढेच नाही तर ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटकेदेखील बसले. यामुळेच हाताशी आलेली भातरोपे पिवळी पडू लागली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात रोपे जळून जातील. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेडसह मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पुनर्लागवड झाली आहे. परंतु पावसाअभावी पुनर्लागवड केलेले भात क्षेत्रदेखील संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षी एक जून रोजी भात पट्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे ४ हजार ३८२ हेक्टरवर भात रोपवाटिका झाल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस पडल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्याने पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. यंदा जिल्ह्यात सुमारे ६१ हजार हेक्टरवर भात लागवडी होण्याचा अंदाज असल्याने मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत.
चौकट
जिल्ह्यातील भात रोपवाटिकांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे
तालुका भात रोपाचे क्षेत्र (हेक्टर)
जुन्नर ११००
आंबेगाव ५६०
खेड ७३३
मावळ १२८०
मुळशी ७७०
भोर ७७५
वेल्हा ५१०
हवेली २२०
पुरंदर १५०