दावडी : खरपुडी-मांडवळा (ता. खेड) येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यामुळे शेकडो एकर शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. दोन महिन्यांपासून डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. कालव्याला अस्तरीकरण नसल्याने शेतात कालव्याचे पाणी झिरपत असून कुठलेही पीक घेता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.खरपुडी-मांडवळा परिसरातून चासकमान धरणाचा डावा कालवा जातो. गेले दोन माहिने या कालव्याला पाण्याचे आवर्तन सुरू आहे. कालव्याला या परिसरात सिमेंटी अस्तरीकरण करावे, अशी मागणी येथील शेतकरी कित्येक वर्षांपासून करीत आहे. मात्र, आजतागायत त्यांच्या मागणीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी पॉली हाऊसची शेती केली आहे. याचा फटका पॉली हाऊसमध्ये घेतलेल्या पिकांना बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येत आहे. कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना यांचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. कालव्याचे अस्तरीकरण करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बबन भोगाडे, वंसतराव भोगाडे, सतीश तनपुरे, संजय भोगाडे, माणिक भोगाडे, मारुती चौधरी या शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)
चासकमान कालव्याच्या गळतीमुळे जमिनी नापीक
By admin | Published: September 30, 2016 4:42 AM