पुणे : ब्रेन डेड झालेल्या नागपूरच्या तरुणाचे यकृत सोमवारी पुण्यात रुबी हॉल क्लिनकमध्ये उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय रुग्णावर यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले. नागपूरहून खास एअर अॅम्ब्युलन्सद्वारे पुण्यातील लोहगाव विमानतळावर आले. त्यानंतर केवळ आठ मिनिटांतच हे यकृत रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले.याबाबत रुबी हॉलच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील २२ वर्षांचा तरुणाचा अपघात होऊन जबर जखमी झाला. या तरुणाला उपचारासाठी नागपूर येथील वोखार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तो ब्रेन डेड झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाने त्यांच्या नातेवाइकांना अवयवदान करण्याची विनंती केली. यानंतर त्यांच्या आई व नातेवाइकांनी तातडीने परवानगी दिली. याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला (झेडटीसीसी) कळविण्यात आले. यानंतर झेडटीसीसीने हे यकृत रुबी हॉल येथे उपाचर घेत असलेल्या ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्याचा निर्णय घेतला. त्याचे यकृत घेऊन विमान हे नागपूरवरून १२ वाजून ३० मिनिटांनी निघाले आणि लोहगाव विमानतळावर १ वाजून ४० मिनिटांनी पोचले. यानंतर ते तेथून केवळ आठ मिनिटांतच ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय समाजसेविका सुरेखा जोशी यांनी दिली. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शीतल धडफळे, प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. बोकील आणि डॉ. मनीष वर्मा यांनी पार पाडली.
नागपूरच्या तरुणाच्या यकृतामुळे पुण्यात एकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:22 AM