लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले. घरात खाण्यास काहीही नसल्याने अनेकांना उपाशी राहण्याची पाळी आली. त्यात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधील एका घरात एकटे राहणारे गृहस्थ तब्बल ८ ते १० दिवस उपाशी राहिल्याने प्रचंड अशक्त झाले. इतके की त्यांना चालत येऊन दरवाजा उघडणे मुश्कील झाले होते. शेजारच्यांमुळे ही गोष्ट समोर आली असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे.
राजेंद्रनगरमधील मनपा वसाहतीतील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सुमारे ५० वर्षांचे गृहस्थ राहतात. गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होते. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ते घरातून बाहेर पडत नव्हते. गेले चार ते पाच दिवस त्यांनी घराचा दरवाजाही उघडला नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांना भीती वाटू लागली. त्यांनी सोमवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला ही बाब सांगितली. त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीचे भरत कळमकर, अमाले फणसे हे मार्शल तेथे गेले. त्यांनी तसेच सोसायटीमधील अनेकांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. परंतु, आतून काहीही उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावले. त्यानंतर यशवंत भोसले व इतरांनी पुन्हा दरवाजा वाजविला. तेव्हा आतून दरवाजा उघडला गेला. सुमारे ५० वर्षांची ही व्यक्ती इतकी अशक्त झाली होती की, त्यांना उठून उभे राहता येत नव्हते. पोलिसांनी त्यांना पाणी पिण्यास देऊन काही मदत हवी का, अशी विचारणा केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने त्यांना मदत करतानाही सर्वांवर मर्यादा आल्या. पोलिसांनी १०८ नंबरला कॉल करुन रुग्णवाहिका मागविली. परंतु, रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका आली नाही. तेथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोसले यांनी सांगितले की, रात्री उशिरा रग्णवाहिका आली. त्यातून आम्ही त्यांना ससून रुग्णालयात नेले. परंतु, तेथे दाखल करून घेण्यात आले नाही. त्यासाठी १० हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर त्यांना नायडू हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे त्यांची कोविड चाचणी केली़ ती निगेटिव्ह आली. परंतु, तेथेही काही उपचार करण्यात आले नाही. शेवटी पहाटे ३ वाजता त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले.
याबाबत राहुल मानकर यांनी सांगितले की, येथील कार्यकर्त्यांना ससून रुग्णालयाचा वाईट अनुभव आला. इतक्या अशक्त व्यक्तीला त्यांनी दाखल करून घेतले पाहिजे होते. आम्ही आता येथील एका डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार करणार आहोत. पोलिसांकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.