शेतकरी संघटनेचा आरोप
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने फेब्रुवारी २०१८ मध्ये विस्तारवाढीसाठी खास सभेचे आयोजन केले होते. यावेळी विस्तारवाढीसाठी सभासदांनी बहुमताने परवानगी दिली. तसेच निधी उभारणीला देखील मंजुरी दिली होती. मात्र संचालक मंडळाच्या हाराकिरीमुळे कारखान्याची विस्तारवाढ रखडली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोक खलाटे यांनी केला आहे.
खलाटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विस्तारवाढ न झाल्याने मागील दोन हंगाम व सध्याच्या चालू हंगामातील सुमारे १२ लाख टन गाळप कमी झाले. यंदाच्या हंगामात कारखाना मे अखेरपर्यंत चालवायचा आहे. तसेच जादा ऊस इतर कारखान्यांना देण्यास सांगितले जात आहे. सध्या उसाला तुरे आले आहेत. परिणामी सभासदांच्या उसाचे एकरी १५ टन नुकसान झाले आहे. संचालक मंडळाने वेळेत विस्तारवाढ केली असती तर सभासदांचा ऊस वेळेत तोडला गेला असता. पिकांसाठी शेत वेळेत रिकामे झाले असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील एका कार्यक्रमामध्ये विस्तारवाढीचे आदेश दिले होते. तसेच पुढील काळात साखरेचे जादा उत्पादन होईल त्यामुळे कच्ची साखर काढावी अशा सूचना संचालक मंडळाला दिल्या होत्या. मात्र सोमेश्वरच्या कार्यकारी संचालकांनी कच्ची साखर परवड नाही, असे सांगितले. त्यावेळी जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर १,८०० रूपये प्रतिक्विंटल होते. तसेच त्याला केंद्र सरकाचे एक हजार रूपये अनुदान मिळत होते. असे मिळून २,८०० रूपयांच्या घरात साखरेचे दर गेले असते. कारखान्याने कच्ची साखर करून साठा केला असता तर त्याच्या व्याजाचा फायदा झाला असते, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
--------------------------------