विमाननगर : लोहगाव येथे भूत दिसल्याच्या भ्रमातून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी कोलकात्त्याला नेण्यात आला. या मन हेलावणाऱ्या गंभीर घटनेमुळे त्याची पत्नी व आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला आहे. अर्णव मुखोपाध्याय (वय ३६) याने मंगळवारी रात्री दारूच्या नशेत भूत दिसत आहे. या भ्रमात कबुतराची अंडी खाऊन बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी केवळ अर्णव व त्याची पत्नी दोघेच घरी होते. घडलेल्या गंभीर प्रकाराची माहिती त्याच्या पत्नीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी नोंदवली.
अर्णव गॅलरीतून खाली कोसळल्यानंतर कारवर आदळून जमिनीवर पडला. त्यामुळे त्याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या आहे. प्रत्यक्षात दारूच्या नशेत त्याने केलेले हे कृत्य हा एक अपघातच म्हणावा लागेल. अर्णव हा उच्चशिक्षित तरुण एका सेल्युलर कंपनीत काम करीत होता. गेल्या वर्षभरापासून तो लोहगाव येथील जिनीबेलिना सोसायटीत रहात होता. एका उच्चभ्रू कुटुंबातील सुशिक्षित तरुणाने भूत दिसल्याच्या भ्रमात जीवन संपविणे ही बाब गंभीर आहे. बुधवारी त्यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. कदाचित शवविच्छेदन अहवालानंतरच दारूच्या नशेत कबुतराची अंडी खाल्ल्यामुळे त्याच्या मानसिकतेत काही बदल झाल्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे, असाही अंदाज आहे. मृतदेह विमानाने कोलकाता येथे नेण्यात आला. कुटुंबीयांसह मित्र, शेजारी सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.व्यसनामुळे सुटतो मेंदूवरील ताबा‘आत्महत्या ही नियोजन करून केली जाते. व्यसनाच्या अतिसेवनामुळे झालेला हा एक अपघात म्हणावा लागेल. दारूच्या अतिसेवनानंतर व्यक्तीचा मेंदू नशेच्या अमलाखाली येतो. काही व्यक्ती दारूसोबत इतर व्यसनेदेखील करतात. या सगळ्यातून मेंदूवरील ताबा सुटल्यामुळेदेखील एखादी व्यक्ती अशी विचित्र कृती करू शकते.- मुक्ता पुणतांबेकर(संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र)