जेजुरी : पुरंदर तालुक्यात १९२ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. एकूण १ लाख ५९ हजार ६३५ मतदारांपैकी सुमारे १ लाख १३ हजार ७४७ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष ६०९३७, तर ५२८१० महिला मतदारांनी मतदान केले.तालुक्यातील चारही गटांत मिळून ७१.२५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली. बहुरंगी निवडणूक राहिल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे तालुक्यातील पक्षप्रमुखांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीत आमचीच सरशी होणार, हेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आज सकाळी ७.३० वाजता तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा दिसत होत्या. यामुळे २७ टक्के मतदान झाले होते. मतदानात तरुण मतदारांचा उत्साह मोठ्यांप्रमाणे जाणवत होता. उमेदवारांची गावे वगळता दुपारी सुमारे ३८ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचल्याने इतर मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या तुरळक होती. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानावर परिणाम जाणवला. मात्र दुपारी ३ नंतर मतदानाचा वेग वाढला. मतदारांनी पुन्हा रांगा लावून मतदान केले.पश्चिम पुरंदरच्या पट्ट्यातील भाविक आज वीर येथील यात्रेला गेलेले असल्याने दुपारनंतर भाविकांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यात्रेहून परतलेल्या मतदारांनी सायंकाळी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने दिवे गराडे गटात कोडीत बुद्रुक येथे रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. ५.३० नंतर सुमारे ३०० पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. या वेळी मतदान केंद्रप्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने ५.३० पूर्वी मतदानासाठी आलेल्या मतदारांना केंद्रासमोर रांगेत उभे केले होते. तसेच काही ठिकाणी ५.३० वाजताही मतदारांच्या रांगा होत्या. बोपगाव येथेही मतदान केंद्रांवरील तांत्रिक अडचणीमुळे मतदान उशिरापर्यंत सुरू ठेवावे लागले. प्रशासनाने रांगेतील मतदारांना मतदान करण्यास सहकार्य केल्याने सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मात्र सर्वच मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९९ मतदान केंद्रांवर जेजुरी पोलिसांनी, तर सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९२ मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी मतदारघोळामुळे मतदारांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. एकाच ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतदान यंत्रे ठेवल्याने मतदारांत संभ्रम जाणवत होता. यामुळे सर्वत्रच क्रॉस व्होटिंग झाल्याची मोठी चर्चा आहे. श्रीक्षेत्र कोडीत येथे यात्रेमुळे मतदान कमी झाल्याने सर्वपक्षीय उमेदवार चिंतेत पडले आहेत. याचा फटका नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला बसेल याचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल. पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांवर दुपारपर्यंत चांगलाच परिणाम जाणवला. मात्र दुपारनंतर यात्रेवरून श्रीनाथभक्त परतल्यावर मतदानाची टक्केवारी वाढली. (वार्ताहर)
बहुरंगी लढतींमुळे मतदानाचा टक्का वाढला
By admin | Published: February 22, 2017 1:47 AM