पुणे : महापालिकेला कोणतही पूर्वकल्पना न देता महामेट्रोच्यावतीने रामवाडीच्या मेट्रो मार्गत परस्पर बदल करण्यात आला आहे. यामुळे तब्बल १९२ कोटी रुपयांनी खर्च वाढला असून, महापालिकेच्या मुख्य सभेला विश्वासात न घेता महामेट्रोचा कारभार सुरू आहे. यामुळे सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने आखण्यात आलेल्या मार्गावरील काम थांबवावे, अशी मागणी करण्यात विरोधकांनी चांगला गोंधळ घातला. यावेळी महामेट्रो सोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. नगर रस्त्यावरून जाणाऱ्या मेट्रो मार्गात बदल करण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवकांनी सभेत उपस्थित केला. त्यानंतर अन्य नगरसेवकांनीही आपली भूमिका मांडली. मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) सर्वसाधारण सभेची मंजुरी आहे. त्यामुळे या कामात काही बदल करायचे असतील तर त्याची कल्पना द्यायला हवी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. ‘तांत्रिक कारणांमुळे या मार्गात बदल केला असून, तो आगाखान पॅलेसच्या बाजूने नेणे शक्य नसल्याचे अतिरिक्त नगरअभियंता श्रीनिवास बोनाला यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यावर आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले, की मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) मान्यता दिल्यानंतर त्यात काही किरकोळ बदल करायचे झाल्यास त्याचे सर्वाधिकार मेट्रो प्राधिकरणाला असल्याचा दावा करण्यात आला. मेट्रो मार्गातील प्रस्तावित बदलांना महामेट्रोच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असून, केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापौर मुक्ता टिळक यांनी मेट्रोचे सुरु असलेले आणि नियोजित कामे, त्यातील अडचणी याबाबत लवकरच महामेट्रोसोबत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.>राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (एनएमएम) मेट्रोच्या बांधकामाला परवानगी नाकारली. त्यामुळे, तीन पर्यायी मार्गांची चाचपणी केल्यानंतर त्यातील कमी खर्चाच्या कल्याणीनगरच्या मार्गाची निवड करण्यात आली. तसेच, मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने ते थांबविता येणार नाही.- सौरभ राव,
मेट्रो मार्गात परस्पर बदल केल्यामुळे महापालिकेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 2:31 AM