बाणेर : पाषाण-सूसरोड येथील महामार्गावरील पूल अरुंद असल्याने वारंवार वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे हा पूल रुंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथील पुलाचे काम सुरू करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्टÑवादीतर्फे देण्यात आला आहे.पाषाण-सूसरोड परिसरातून हिंजवडीकडे जाणाºया वाहनांमुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. चांदणी चौक परिसरातील पुलाच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. या पुलाअगोदर सूसरोड येथील पुलाचे काम होणे आवश्यक आहे.या परिसरात सर्व जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. या पुलासाठी पालिकेने ३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु प्रशासनाच्या व राष्ट्रीय महामार्ग रस्ते विभागाच्या उदासीनतेमुळे पुलाचे काम रखडले. वारंवार मागणी करूनही पुलाचे काम होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस असतात. परंतु पुल अरुंद असल्याने धोकादायक पद्धतीने वाहतूक नियंत्रण करावी लागते. या पुलावर महामार्गावरील सर्व्हिस रस्ते वर सोडण्यात आल्याने महामार्गावरून सूसरोडकडे येणारी वाहने वाहतूककोंडीत अधिक भर घालतात. सूसरोड परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सूसखिंडीतील पूल करण्याची मागणी बाणेर-पाषाण लिंक रस्ता विकास समितीच्या माध्यमातूनदेखील करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे सूसरोड अध्यक्ष समीर उत्तरकर म्हणाले, चांदणी चौक परिसरातील जागा ताब्यात नसताना कोट्यवधी रुपये खर्च करून तो पुल उभारण्यात येणार आहे. परंतु सूस खिंडीतील जागा ताब्यात असूनही प्रशासन योग्य दखल घेत नाही. महामार्ग विभागाने या पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे.राष्ट्रवादीचे प्रमोद निम्हण म्हणाले, सूसरोड येथील महामार्गावरील पुलावर वारंवार वाहतूककोंडी होते. अपघात होत आहेत. चांदणी चौक पुलाबरोबर हा पूलदेखील हिंजवडी आयटी पार्कसाठी महत्त्वाचा आहे. या पुलाचे काम लवकर सुरू झाले पाहिजे.
अरुंद पुलामुळे कोंडीच कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:25 AM