पुणे : राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी (दि. ३०) सोडला. जगताप हे संरक्षण दलात पुन्हा रुजू झाले. संरक्षण दलातून प्रतिनियुक्तीवर ते ‘पीएमपी’चा पदभार घेतले होते. जगताप यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे पत्र मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून तसे पत्रच आले नाही.
डॉ. राजेंद्र जगताप हे संरक्षण दलात ‘आयडीईएस’ या पदावर कार्यरत होते. २४ जुलै २०२० रोजी प्रतिनियुक्ती घेऊन त्यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या अकरा महिन्यांच्या कार्यकाळात पाच रुपयात पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूकसेवा यासारखे निर्णय झाले. ‘पीएमपी’तील संचालकांचा प्रश्नही त्यांच्या कार्यकाळात गाजला. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्याकडे सध्या ‘पीएमपी’चा पदभार देण्यात आला आहे.