धनकवडी : महिला व बालकल्याण विभागाकडे राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाकडून २०११ पासूनची माहिती मागवण्यात आली. यामधून मिळालेल्या माहितीतून भिक्षेकरी केंद्रातून भिक्षेकऱ्यांच्या संख्येत अर्ध्याने घट झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी २०११ पासून भिक्षेकरीगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांच्या संख्येबाबत माहिती मागवण्यात आली. यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केवळ १३ केंद्रे उपलब्ध असून, त्यांपैकी पुणे शहरामध्ये येरवडा (फुलेनगर) येथे एक आहे. या एकाच केंद्रामध्ये ११५ची क्षमता असतानादेखील या ठिकाणी इमारतक्षमता ४५ एवढी असल्याने चाळीस लाख क्षमतेच्या शहराला केवळ १०० ते १५० भिक्षेकऱ्यांची सोय करणे म्हणजे हास्यापद असल्याचे सांगितले.महिला व बालकल्याण विभागाने भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ या कायद्यान्वये कडक कारवाई व्हावी म्हणून २०११ पासून पोलीस विभागाला ३६ पत्रे पाठविली असून, त्यावर अत्यल्प कारवाई झाली आहे. यातच अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडे रस्त्यावरील भिकारी पकडण्याची कोणतीही व्यवस्था किंवा पथक नाही. तसेच पुणे महानगरपालिकेकडे भिक्षेकरी केंद्र नाही किंवा शहरामध्ये किती भिक्षेकरींची संख्या आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे संघटनेला कळवले आहे. (वार्ताहर)राज्यातील विविध भिक्षेकरी केंद्रातील आकडेवारीप्रमाणे २०११-१२ मध्ये १६८४४ , २०१२-१३ मध्ये १३४८७, सन २०१३-१४ दरम्यान ११२१५ २०१४-१५ मध्ये ८६९९ व २०१५ -१६ मध्ये ६८३८ इतकी संख्या कमी होत गेल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच पाच वर्षांमध्ये केंद्रामधील संख्या निम्म्याने कमी झाली असली तरी रस्त्यावर असलेल्या भिक्षेकऱ्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली असता त्यात दुपटीने वाढ झाली असून, शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून जनजागृती करण्याबद्दल संघटनेचे शहर अध्यक्ष संतोष कपटकर यांनी खेद व्यक्त केला असून, मनपा व राज्य प्रशासनाने भिकारीमुक्त शहराचा संकल्प करावा, असेदेखील प्रशासनाला आवाहन केले आहे.
भिक्षेकरी केंद्रातील भिक्षेकऱ्यांच्या संख्येत घट
By admin | Published: June 28, 2016 1:05 AM