पुणे : पालिकेच्या महत्वाकांक्षी मुळा-मुठा नदी संवर्धन योजनेचा खर्च दफ्तर दिरंगाईमुळे तब्बल २५० कोटींनी वाढला असून या प्रकल्पाचा खर्च १ हजार २३६ कोटींच्या घरात जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून जूनमध या योजनेचे काम सुरु केले जाण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी ९९० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला होता. केंद्र शासनाचाही यामध्ये सहभाग मिळणार होता. केंद्र शासनाची २०१४-१५ साली मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे काम २०२०-२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. केंद्र शासनाकडून तीन वर्ष सल्लागारच नेमण्यात आला नाही. तसेच प्रकल्पासाठी मागविलेल्या निविदांमधील तीन निविदा दुप्पट दराने आल्या.
त्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या. याविषयावर बराच खल झाल्यानंतर एकच निविदा काढण्यास परवानगी देण्यात आली. प्रकल्प खर्चाला इस्टिमेट कमिटीने मान्यता द्यावी तसेच आवश्यक जागांचे १०० टक्के भूसंपादन करावे असे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार प्रशासनाने १ हजार ५०० कोटींच्या खर्च इस्टिमेट कमिटीसमोर ठेवला होता. यातील अनावश्यक खर्च कमी करण्यात आला असून १ हजार २३६ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
====
अंदाजित खर्च
११ एसटीपी उभारणी - अन्य बांधकाम - १ हजार २० कोटी
प्रकल्प चालविणे- देखभाल दुरूस्ती - २१६ कोटी (१५ वर्षांकरिता)