बिबवेवाडी : के. के. मार्केटच्या पाठीमागील नाल्याशेजारी असलेल्या गौड ब्राह्मण समाज मंदिर येथील पदाधिकारी व बाजूलाच असलेल्या गॅरेजवाल्यामध्ये वहीवाटीच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या जुन्या चारचाकी गाड्यांवरून बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिवीगाळ तसेच मारहाणीचा प्रयत्न घडला.के. के. मार्केटच्या पाठीमागे गौड ब्राह्मण समाजाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी असलेल्या दक्षिण बाजूने रस्त्याच्या वापरावरून गॅरेज व्यावसायिक आणि मंदिर व्यवस्थापनामध्ये वाद सुरू आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनाने अतिक्रमण करून हा रस्ता आतमध्ये जोडून घेतल्याचे तसेच खरेदीखतावरही वहिवाटीचा हाच रस्ता गॅरेज व्यावसायिकाचे म्हणणे आहे. मंदिर व्यवस्थापनाने समोरील जागा मटका विक्रेत्याला भाड्याने दिल्याने वाहने लावण्यासाठी जागा नसल्याचा तसेच वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा आरोप गॅरेज व्यावसायिकाने केला आहे. तर गॅरेज व्यावसायिकाने जाणीवपूर्वक जुनी वाहने बेवारस अवस्थेत या जागेमध्ये लावून अतिक्रमण केले असून, या ठिकाणी मद्यपी आणि नशेखोरांचा त्रास होतो. मोकळी जागा मंदिराच्या मालकीची असून, येथे वाहने लावण्यास गॅरेजवाल्याचे कामगार मज्जाव करतात. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात व्यत्यय येत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरुवारी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना बेवारस वाहनांचा अडथळा होऊ लागल्याने बिबवेवाडी पोलिसांना बोलावण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने ही वाहने हटविण्यात आली. मात्र गॅरेज व्यावसायिकाने आक्षेप घेतल्याने क्रेन परत पाठवावी लागली. समाजातील लोकांनी आक्रमक भूमिका घेत हातानेच काही गाड्या उचलून बाजूला केल्या.या वेळी दोन्ही बाजूच्या महिलांमध्ये भांडणे झाली. पोलिसांना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले असता तुमचे तुम्ही बघून घ्या, असे म्हणत नियंत्रण कक्षाला फोन कशाला लावता, असे दरडावल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. यापूर्वी येथील गाड्या फोडल्याच्या दिलेल्या तक्रारींवर काहीच कारवाई झालेली नसल्याचेही या महिला म्हणाल्या. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की दोन्ही बाजूच्या लोकांना त्यांच्या कागदपत्रांसह बोलवणार असून, अतिक्रमण विभाग, वाहतूक विभाग व बिबवेवाडी पोलीस या तिघांची एकत्र कायदेशीर कारवाई करून या वादाचा कायमचा तोडगा काढून देण्यात येईल. (वार्ताहर)
पार्किंगवरून दोन गटांत वाद
By admin | Published: December 23, 2016 12:56 AM