पुुणे: रस्त्यांवर थुंकणाऱ्या १ हजार २७ नागरिकांकडून महापालिकेने १ लाख ९५ हजार रूपयांचा दंड आतापर्यंत वसूल केला आहे. महापालिकेची ही मोहिम चांगलीच गाजत असून त्याचे सर्व थरातून, विशेषत: वाहनधारक महिलांकडून फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. राज्य सरकारने यासंबधीचा अध्यादेश जारी केल्यानंतर त्याची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.त्यामुळेच आता रात्रीच्या वेळेसही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे १८० आरोग्य निरीक्षक शहरात कार्यरत आहे. त्यांना त्याची हद्द निश्चित करून देण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारीत मुकादम व त्याची टोळी म्हणजे सफाई करणारे कामगार असतात. आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १५ कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहे. या सर्वांनीच त्यांचे दैनंदिन कार्यालयीलन कामकाज सांभाळून हे थुंकणाºयांना धडा शिकवण्याचे काम करायचे आहे. तशी कल्पनाही त्यांना देण्यात आली आहे. या मोहिमेचे सूत्रधार असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, राज्य सरकारच्या अध्यादेशाची आम्ही प्रभावी अंमलबजावणी करत आहोत, बाकी काहीच नाही. कायद्याचे अधिष्ठान मोहिमेला आहे. १५० रूपयांची पावती देण्यात येते. ज्याला थुंकताना पकडले त्याच्याबरोबर नम्रपणे वागायचे असे स्पष्ट आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. पावती द्यायची, त्याला बादलीत पाणी व फडके किंवा झाडू द्यायचा, नम्रपणेच स्वच्छता करायला सांगायचे असे सांगण्यात आले आहे. वाद, भांडणे होऊ नयेत हेच यामागचे कारण आहे.नोव्हेंबर २ पासून मोहिम सुरू करण्यात आली. शहरातील सर्व प्रमुख चौक, सिग्नल्स, रस्ते यावर प्राधान्याने काम करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे दुपारी १२ ते २ यावेळात हे काम करण्यात येते. आतापर्यंत १ हजार २७ जण सापडले आहेत, त्यांच्याकडून १ लाख ९५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. एकदाही भांडण, किंवा वादविवाद झाले नाही अशी माहिती मोळक यांनी दिली. थुंकणाऱ्याला आपण चूक केली आहे हे समजतच असल्यामुळे त्याच्याकडून वाद होत नाही असाच बहुसंख्य कर्मचाऱ्यांचा अनुभव असल्याचे ते म्हणाले. त्यातच बरोबर अनेकजण उपस्थित असल्याने स्वच्छता करून व दंड देऊन विषय संपवल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. एकदा हे केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा रस्त्यावर थुंकण्याचे काम त्यांच्याकडून कधीच होणार नाही असा विश्वास मोळक यांनी व्यक्त केला. दंड झालेल्यांपैकी अनेकांनी अशी चूक आयुष्यात पुन्हा कधीही करणार नाही असे सांगितले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:17 PM
महापालिकेचे १८० आरोग्य निरीक्षक शहरात कार्यरत आहे.
ठळक मुद्देअध्यादेश जारी केल्यानंतर त्याची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका पहिलीरात्रीच्या वेळेसही धडक कारवाई करण्याचा निर्णय आतापर्यंत १ हजार २७ जण, त्यांच्याकडून १ लाख ९५ हजार रूपये दंड वसूल