एमपीएससी परीक्षेत यश : आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवलाजिद्दीच्या जोरावर शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदारशेलपिंपळगाव : आई - वडील शेतकरी, शेतीवरच सगळा चरितार्थ. कधी पिकत नव्हतं, पिकलं तर विकलं जाईल याची शाश्वती नव्हती आणि विकलं गेलं तर चांगला पैसा मिळेल का? याची भ्रांत होती. मात्र अशा विदारक परिस्थितीतही शेतकरी आई - वडिलांनी मुलाच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही आणि मुलानेही जिद्दीच्या जोरावर कठोर परिश्रम करत आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत तहसीलदार होण्याचा पराक्रम केला. करंदी (ता.शिरूर) गावातील हेमंत आबासाहेब ढोकले यांची ही यशस्वी परिकथा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी तहसीलदार पद मिळवलं आहे. त्यामुळे करंदी गावामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हेमंतचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर गावातीलच दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कनिष्ठ विद्यालयीन शिक्षण शिरूरमधील विद्याधाम प्रशालेत घेऊन अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. प्रारंभी काही दिवस एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. मात्र उच्च प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा हेमंतला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. मनात जिद्द, चिकाटी व अभ्यासाची कास धरली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात या शेतकऱ्याच्या मुलानं पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. सिंधुदुर्ग, पालघर व वसई पोलीस ठाण्यात प्रशासकीय सेवा केली. यादरम्यान अभ्यासात कधीही खंड पडू न दिल्याने त्यांनी मुख्याधिकारी पद देखील मिळवलं. लोणंद नगरपालिकेत सन २०१९ पासून ते मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान श्रेणी एकचे (क्लासवन) अधिकारी होण्याची तीव्र इच्छा उरी असल्याने हेमंत यांनी स्पर्धा परीक्षेचा पुढील अभ्यास सुरुच ठेवला आणि तहसीलदार होऊन ही इच्छा सत्यात उतरवली आहे. हेमंत यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
" तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. अपयशाला पचविण्याची ताकद असेल तर निश्चितच यश मिळू शकते हा माझा अनुभव आहे. आपल्या यशात आई - वडिलांच्या कष्टाचा आणि भाऊ, पत्नी व मित्रांच्या पाठबळाचा मोलाचा वाटा आहे. या पदाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे गोरगरीब जनतेची सेवा करणार आहे. माझा जिल्हाधिकारी होण्याचा मानस आहे. - हेमंत ढोकले, तहसीलदार