सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:56 PM2019-02-04T18:56:24+5:302019-02-04T18:57:53+5:30
देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पुणे: केंद्रातील भाजप सरकार विरोधात कोणत्याही व्यक्तिने आवाज उठवल्यास भाजपच्या मंत्र्याकडून संवाद साधला जात नाही. हे अहंकाराचे लक्षण आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरलेला आहे. मात्र, जिथे अहंकार येतो तिथे विनाश निश्चित असतो. देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांमुळे निवडणुक आयोग, सीबीआय यांसारख्या संस्थांची स्वायत्ता देखील धोक्यात आले आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे नवज़्योत सिंग सिध्दू यांनी भाजपासरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यांवर हल्लाबोल चढविला.
नवज्योत सिंग सिध्दू यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिध्दू म्हणाले, देशात शेती मालाला कवडीमोल भाव मिळतोय, तसेच बेरोजगारी, गुन्हेगारी वाढली आहे. मात्र याविषयी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाही. ज्या उद्देशासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तो फसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगतानाच त्यांना सोपविलेली जबाबदारी सोपी नक्कीच नाही. प्रियंका यांच्या खांद्यावर देशातील सर्वात अवघड भाग समजला जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे. परंतु, प्रियंका गांधी यांचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्याचबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत एका दिवसात ७५० कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित करतानाच ते नोटाबंदीच्या काळात कोणत्याही रांगेत उभे दिसले नाही असा टोलाही त्यांनी शहा यांना लगावला.