पुणे : झगमगाटाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची रविवारी आलेल्या जोरदार पावसामुळे जोरदार तारांबळ उडाली. रस्त्यावर, फुटपाथवर पणत्या, उटणे, साबण, उदबत्ती, तेल, आकाशकंदील, रांगोळी आदींची हंगामी दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांची या पावसामुळे चांगलीच पळापळ झाली. खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे मध्यवस्तीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.खरेदीसाठी रविवार हा महत्त्वाचा दिवस असतो, त्यामध्ये दिवाळीतील रविवार तर व्यापारी व विक्रेतावर्गासाठी मोठी पर्वणी असते. यंदा पाऊस चांगला झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरेदीसाठी उत्साहाने लोक बाहेर पडत आहेत. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून सलग येत असलेल्या मोठ्या पावसाचा खरेदीदार, व्यापारी व विक्रेत्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, तुळशीबाग, मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. सगळीकडचे पार्किंग फुल झाल्याने नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी मोठी शोधाशोध करावी लागत होती. अनेक नागरिकांनी त्यांच्या मोटारी नदीपात्र, ओंकारेश्वर मंदिराजवळचा पूल, शनिवारवाडा येथे पार्क करून खरेदीसाठी पायी जाण्याचा पर्याय निवडला. दुचाकीवर आलेल्या ग्राहकांना गाडी लावण्यासाठी मोठा फेरफटका मारावा लागला. दुपारी दोनच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांना सामान उचलून आडोसा शोधावा लागला. काही जणांनी मेन कापडाखाली आसरा शोधला. चांगला तासभर मोठा पाऊस झाला. पावसात पणत्या, आकाशकंदील, उटणे, फराळाचे साहित्य भिजू न देण्यासाठी त्यांना पळापळ करावी लागली.पाऊस ओसरल्यानंतर दुपारी ४ वाजल्यापासून बाजारपेठेमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. दिवाळीनिमित्त कपडे, पर्स, बांगड्या, शूज आदी खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती.दिवाळीनिमित्त अनेक लॉन्स, कार्यालये इथे विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनांना पावसाचा थोडासा फटका बसला. अनेक ग्राहकांनी पावसामुळे रविवारची खरेदी उद्यावर ढकलली. दिवाळीसाठी गावी जायचे असलेले विद्यार्थी, नागरिक मात्र पावसाची पर्वा न करता खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून येत होते. यंदा नागरिकांचा खरेदीसाठी चांगला उत्साह दिसून येत आहे, मात्र पावसामुळे खरेदीला फटका बसत असल्याचे विक्रेते गणेश महाजन यांनी व्यक्त केली. खाद्यपदार्थांची विक्री करणाºयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
पावसामुळे तारांबळ, खरेदीसाठी गर्दी : हंगामी विक्रेत्यांची धावपळ, वाहतूककोंडीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:32 AM