लोकमत न्यूज नेटवर्कनिरवांगी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात मध्यंतरीच्या काळात झालेला जोमदार पाऊस व नंतरच्या काळात उघडीप मिळाल्याने सध्या पेरण्यांना वेग आला आहे. पेरण्या काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर बऱ्याच ठिकाणी आधुनिक पेरणी यंत्राच्या सहायाने कमी खर्चात पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, घोरपडवाडी व खोरोचीसह अन्य भागांत गेल्या दोन दिवसांपासून पेरणीला सुरुवात झाली आहे. या व अन्य भागांत मध्यंतरीच्या काळात दमदार पावसामुळे परिसरातील ओढेनाले तर वाहत आहेत परंतु काही दिवसांपूर्वी तळ गाठणाऱ्या विहिरी पावसामुळे तोंडाला आल्याचे काही ठिकाणी चित्र आहे. सध्या पावसामुळे या परिसरात बैलाकडून पेरणी, साध्या पद्धतीचे ट्रॅक्टर अवजार या दोन्हींमध्ये मनुष्यबळाचा वापर करत पेरणी होत आहे. याचबरोबर अत्याधुनिक पेरणी यंत्राचा वापर केला जात आहे. हे पेरणीयंत्र दोन ते तीन मजूर वाचवत आहे. यामुळे वेळ आणि पैसा बचत होत आहे. बैलाकरवी होणाऱ्या पेरणीला एकरी खर्च २२०० ते २४०० पर्यंत होतो तर ट्रॅक्टर अवजार पेरणीला एकरी २२०० ते २३०० पर्यंत खर्च होत आहे. यामुळे नव्याने आधुनिक पेरणीयंत्र आले असल्यामुळे पेरणी वेगात होत आहे. हे यंत्र मजुराविना पेरणी होत असल्याने केवळ दीड हजारात पेरणी होत आहे. या पेरणीयंत्राच्या वरील भागात दोन बॉक्स, एका बॉक्समध्ये बी तर दुसऱ्या बॉक्समध्ये रासायनिक खते टाकली जातात. चौदा नळ्याच्या माध्यमातून रासायनिक खते व बी प्रमाणानुसार सारा व पाळी टाकत पेरणी होत आहे. पेरणीयंत्र पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सध्या मका, बाजरी, सोयाबीन, सूर्यफुलासह चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
पावसाच्या उघडिपीमुळे पेरण्यांना वेग
By admin | Published: June 26, 2017 3:40 AM