इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या उन्हाच्या झळा वाढलेल्या असून, दिवसभर रस्त्यावर असणारी तोबा गर्दी अत्यंत अल्प प्रमाणात दिसू लागली आहे. तर याच उन्हाचा परिणाम इंदापूर शहराच्या बाजारपेठेवर झालेला दिसतो. रविवार आठवडी बाजार असताना देखील, उन्हाची तीव्रता व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव या दोन्ही कारणांमुळे इंदापूर शहरात सकाळपासून अत्यंत अल्प प्रमाणात गर्दी दिसत होती.
इंदापूर तालुक्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये फरक झालेला नव्हता. परंतु मागील वर्षापासून सातत्याने वातावरणात अत्यंत वेगाचा फरक असल्यामुळे व मागील काही आठवड्यांत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाला. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. परंतु पावसाचे वातावरण जाताच पुन्हा सूर्य आग ओकायला लागला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी १२ वाजल्यापासून शहरातील रस्त्यावर नागरिकांची गर्दीही विरळ होताना दिसून येते. परंतु महत्त्वाच्या कामांसाठी तुरळक प्रमाणात नागरिक बाहेर पडताना दिसत आहे.
तर मागील आठ दिवसांपासून नागरिक उसाचा रस, ज्यूस, लिंबू सरबत तसेच आईस्क्रीमचे सेवन करताना दिसून येत होते. मात्र शासनाचे नवे नियम व कोरोना आजाराचे रुग्ण सध्या इंदापूर तालुक्यात वाढत असल्यामुळे पुन्हा या थंड पेयांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तर काही ठिकाणी असे शीतपेय व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. तसेच गावोगावी काही प्रमाणात भरणारे आठवडे बाजार यावर उन्हाचा प्रचंड परिणाम झाला आहे.
वाढत्या तापमानाची झळ नागरिकांसोबतच जनावरांनासुध्दा बसत आहे. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ओंकारनाथ ताटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या नागरिकांनी आपली व कुटुंबातील सर्व सदस्यांची खबरदारी घेण्याची गरज असून, या वर्षी सध्या तापमानवाढीला सुरुवात आहे. अशा वेळी नागरिकांनी तापमानाची माहिती घेण्यासाठी रेडिओ तसेच मोबाईलच्या माध्यमातून बातम्या पाहाव्या. शक्यतो पांढरे कपडे वापरून छत्री, गाॅगल वापरावा. जास्त बाहेर फिरू नये आहे, अशी माहिती डॉ. ताटे यांनी दिली.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये
इंदापूर शहरात व परिसरामध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे व इंदापूर शहर हे कोरोनामुक्त करण्यासाठी, नागरिकांनी खबरदारी म्हणून महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडले पाहिजे. उन्हाची तीव्रता देखील वाढलेली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले आहे.
०४ इंदापूर
इंदापूर शहरातील बाजारपेठेत पसरलेला शुकशुकाट.