मंचर - डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची धग जाणवत आहे. मार्च महिन्यात कडक ऊन पडले असून, अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने जाणवत आहे. आंबेगाव तालुक्यासाठी डिंंभे धरण हे वरदान ठरले आहे. डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, भराडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांसाठी डिंंभेच्या घोड शाखेला पाणी सोडण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली होती. लौकी येथील ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यासाठी दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. घोड शाखेला आवर्तन सोडल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत, अशी माहिती लौकीचे सरपंच संदेश थोरात, गजाबा थोरात, शेतकरी संतोष थोरात यांनी दिली आहे.डिंंभे धरणातून डाव्या कालव्याच्या घोड शाखेला कालव्यातून १०० क्युसेक्सने पाणी सुरू आहे.हा कालवा १० किमी लांबीचा असून परिसरातील १० गावांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.सध्या शेतामध्ये उन्हाळी बाजरी, कांदा, मका, तसेच ऊस पीक असून त्याला फायदा होणार आहे.
डिंभेच्या आवर्तनामुळे पिकांना मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:59 AM