अमोल जायभाये, पिंपरी प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगाणाऱ्या विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्षात साकरण्याची संधी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामधून अवघ्या दोन वर्षात ५० विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. अशा प्रकारच्या सुविधा पुरवणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा वाढत आहेत. शहराच्या विकासा बरोबरच शहरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमधून राज्य पातळीवर आणि देशपातळीवर झळकावे, यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना मोफत व उत्तम दर्जाची अभ्यासिका उपलब्ध करुन दिली आहे. त्यामध्ये चार लाखाची पुस्तके उपलब्ध करुन दिल्यामुळे अभ्यासामध्ये सगळे संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर येथे स्पर्धा परीक्षा केंद्र्र सुरू केले आहे. तिथे २५० विद्यार्थ्यांची अभ्यासाची व्यवस्था आहे. त्यांतर दुसरी अभ्यासिका सांगवीमध्ये शहिद अशोक मारुतीराव कामटे यांच्या नावाने सुरू केले आहे. येथे १०० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. यमुनानगर येथील अभ्यासिकेमध्ये मुला-मुलींसाठी अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था आहे. येथे सध्या ५० मुली अभ्यास करत आहेत. यमुनानगर येथील स्पर्धा परीक्षा केंद्र २०१२ मध्ये सुरू केले. तेव्हा फक्त महापालिकेने ५० मुलांसाठी मोकळा हॉल उपलब्ध करुन दिला होता. विद्यार्थी संख्या वाढल्याने हा आकडा १५० वर गेला. त्यामुळे दोन वर्षामध्ये पालिकेने विद्यार्थी संख्या वाढविली. बैठक व्यवस्थेसाठी २५ लाखाचा खर्च केला आहे.
महापालिकेच्या बळामुळे विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
By admin | Published: April 13, 2015 6:17 AM