पुणे : शहरातील बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये मुलींना रात्रीच्या वेळी ग्रंथालयात बसण्यास परवानगी नाकारण्यात आली असल्याने विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे मुलींच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यातील नावाजलेले महाविद्यालय म्हणून बी. जे. महाविद्यालयाची ओळख आहे; मात्र याठिकाणी मुलींना अशाप्रकारे दुजाभावाची वागणूक का देण्यात येते, असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे. सध्या बीजे मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हे ग्रंथालय २४ तास खुले असते; पण १५ दिवसांपूर्वी विद्यार्थिनींना रात्री अकरानंतर प्रवेश नाकरण्यात आला. याबाबत काही विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्यांना कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. बीजे महाविद्यालयात नर्सिंग, एम.बी.बी.एस. यांसारख्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या ग्रंथालयात अभ्यासासाठी बसतात. वैद्यकीयच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना अचानकपणे प्रशासनाने विद्यार्थिनींना ग्रंथालयात रात्री ११नंतर बसण्यास परवानगी नसल्याचा निर्णय घेतल्याने आमचे नुकसान होत असल्याची खंत विद्यार्थिनींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या मुख्य वसतिगृहात राहतात. तेथे त्यांना २४ तास अभ्यासकक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे; मात्र शिक्षणाचाच एक भाग असलेली इंटर्नशिप करणाऱ्या व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ससून रुग्णालयाच्या आवारातील नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात राहतात. याठिकाणी विद्यार्थिनींसाठी अभ्यासकक्ष नसून या विद्यार्थिनी अभ्यास करण्यासाठी पूर्णपणे ग्रंथालयावर अवलंबून असल्याचे ‘लोकमत’ने विद्यार्थिनींशी संवाद साधला असता लक्षात आले.
बीजेच्या विद्यार्थिनींना दुजाभाव
By admin | Published: November 09, 2016 3:03 AM