पुणे : कर्णधार कौशल तांबे याने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने बीसीसीआयतर्फे आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी मेघालयविरूद्ध पहिल्या डावात ४ बाद ६२३ (घोषित) धावांचा डोंगर उभारला.
कडपा येथील आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेच्या वायएसआर रेड्डी स्टेडियमवर ही ४ दिवसीय लढत सुरू आहे. कौशलने मेघालयच्या गोलंदाजांची धुलाई करताना ३९१ चेंडूंत नाबाद ३०० धावा फटकावल्या. त्याने या खेळीत २ षटकार आणि ३६ चौकार लगावले. सचिन धस याने २४९ चेंडूंत २८ चौकारांसह १५५ धावांची शानदार शतकी खेळी साकारली.या दोघांच्या शतकानंतर यष्टीरक्षक-फलंदाज वरद कुलकर्णी यानेही शतकी तडाखा दिला. त्याने २०८ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या. यात १० चौकारांचा समावेश आहे. एकवेळ महाराष्ट्राची अवस्था ३ बाद ८१ अशी होती. त्यानंतर कौशल-सचिन जोडीने चौथ्या गड्यासाठी २५९ धावांची भागिदारी करीत महाराष्ट्राला सुस्थितीत नेले. त्यानंतर कौशल-वरद जोडीने पाचव्या गड्यासाठी नाबाद २८३ धावांची भागिदारी करीत मेघालयच्या माऱ्यातील हवाच काढून घेतली.कौशलचे त्रिशतक पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राचा डाव घोषित करण्यात आला. यानंतर आज, दुसºया दिवसअखेर मेघालयची अवस्था २ बाद २७ अशी वाईट झाली. विकी ओस्तवाल आणि ओंकार पटकल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्याचे २ दिवस शिल्लक असून मेघालय संघ पहिल्या डावात अद्याप ५९६ धावांनी मागे आहे. उद्या मेघालयचा पहिला डाव झटपट गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न असेल.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : १६३ षटकांत ४ बाद ६२३ धावांवर घोषित (कौशल तांबे नाबाद ३००, सचिन धस १५५, वरद कुलकर्णी १०१). मेघालश : दुसरा डाव : २३ षटकांत २ बाद २७ (विकी ओस्तवाल १/४, ओंकार पटकल १/९).