पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिल महिन्यात घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, मागील वर्षाच्या परीक्षा केंद्राच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या चार पटीने वाढणार आहे.
कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी राज्यातील काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. परिणामी, परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च व दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दोन वेळा प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेची संधी
काही विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा देताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे परीक्षेपूर्वी व परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील. तसेच नियमित लेखी परीक्षा देणे शक्य झाले नाही तर या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाईल.
परीक्षा केंद्रात २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने एका केंद्रात केवळ २५ विद्यार्थ्यांची झिकझॅक पद्धतीने बैठक व्यवस्था केली जाईल. तसेच यंदा प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय असल्याने दहावीसाठी २१ हजार ३४१, तर बारावीसाठी ९ हजार ६१३ परीक्षा केंद्र असणार आहेत.
परीक्षेस ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी
मंडळाकडे बारावीच्या परीक्षेसाठी आत्तापर्यंत १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी, तर दहावी परीक्षेस १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा अर्ज भरण्यास मुदत असल्याने त्यात आणखी काही विद्यार्थ्यांची वाढ होऊ शकते.