पुणे : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये कुटुंब नियोजनाच्या आठ हजार ९२१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ ४४ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरोना काळात म्हणजे गतवर्षी ही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण ११ टक्के होते. विशेष म्हणजे सुखी कुटुंबासाठी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिला आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
पुरुषी अहंकारामुळे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचा वाटा कमी असल्याची स्थिती आहे. एक किंवा दोन अपत्ये झाल्यावर महिलांनीच शस्त्रक्रिया करून घ्यावी, असा समज रूढ झाला आहे. पुरुषही शस्त्रक्रिया करू शकतात. याकरिता शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांना १,४५१ रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील महिलांना ६०० रुपये, त्यावरील संवर्गातील महिलांना २५० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. नसबंदी केली म्हणजे पुरुषत्व कमी होईल. यामुळे अनेक पुरुष शस्त्रक्रिया करीत नाहीत. महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा समज झाला आहे. यामुळे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण कमी आहे. कोरोना काळात तर या शस्त्रक्रियेचे प्रमाण ११ टक्के होते. आजही या शस्त्रक्रियेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा बदलला गेला नाही.
तू कारे मागे मर्दा
गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात केवळ ४४ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. तर ४ हजार १९९ महिलांनी शस्त्रक्रिया केली आहे. आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे. सुखी कुटुंबासाठी जशा महिला सरसावल्या आहेत. तसे पुरुषांनीही पुढाकार घेऊन शस्त्रक्रिया करून घेण्याची आवश्यकता आहे.
वयाच्या ४५ वर्षांपर्यंत करा शस्त्रक्रिया
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपक्रमदेखील शासनाकडून राबविले जात आहे. आशा सेविका घरोघरी भेटी देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्व अधोरेखित करत आहेत. ही शस्त्रक्रिया वया ४० ते ४५ वर्षांपर्यंत केली जाऊ शकते.
वर्ष उद्दिष्ट शस्त्रक्रिया टक्केवारी
२०१७-२०१८- २६४०६-२०७०४-७८
२०१८-२०१९- २६४०६- २३२४५-८८
२०१९-२०२०-२६४०६- १५७२८-६०
२०२०-२०२१-२६४०६- २८८३-११
२०२१-२०२२-२६४०६- ८९२१-३४