पुणे : कोरोना संकटात गेल्या दीड - दोन वर्षात राज्यातील तब्बल 15 हजार 495 गरिब व सर्वसामान्य कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पुणेम्हाडामुळे साकार झाले आहे. दोन-तीन वर्षांतून एखादी सोडत काढणा-या पुणे म्हाडाने मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांत तब्बल चार बंपर सोडत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन महिन्यातच पुन्हा एकदा तब्बल 2700 घरांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार (दि.26) रोजी सायंकाळी 4 वाजता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती माने-पाटील यांनी दिली.
पुणे म्हाडाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी 4 हजार 222 घरांसाठी सोडत काढली होती. यासाठी तब्बल 70 हजार पेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले होते. सध्या या घरांसाठी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हडाच्या वतीने स्वतंत्र शिबिर आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरामुळे लोकांची खूपच मदत झाली आहे. माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खाजगी बिल्डरांची बैठक घेऊन कायद्यानुसार म्हाडाला 20 टक्के फ्लॅट तातडीने उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले. यासाठी सतत पाठपुरावा केला. यामुळेच केवळ दीड वर्षांत पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना पुण्यात प्रसिद्ध बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये परवडणा-या दरामध्ये घरे उपलब्ध झाली. आता पुन्हा एकदा पुणे म्हडाच्या वतीने 2700 घरासाठी सोडत काढत येत आहे. यामध्ये प्रथमच उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी ताथवडे येथे 680 लॅव्हिश घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे.