सांगवी (बारामती ): राशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे करून गेली तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण दिवस रेशन दुकानासमोर घालवावा लागत असल्याने बारामती तालुक्यातील नागरिक चांगलेच वैतागलेले पाहायला मिळाले. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्याच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानांदाराना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.
ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने वैतागलेल्या बारामती तालुक्यातील शिरश्णे गावातील नागरिकांनी रेशन दुकानासमोरच मशीन पद्दत बंद करण्याचे नारे देऊन शासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात आवाज उठवला आहे. स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.
गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभरात एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.अनेकदा उद्भवणाऱ्या तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असून बऱ्याच ठिकाणी राशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते.
सातत्याने जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये हा सावळागोंधळ सुरू आहे. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी सात वाजल्यापासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असूनसुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.
ई-पॉस मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच 'आरसी नंबर' टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाला किती धान्य मिळणार हे स्पष्ट होते. या प्रक्रियेनंतर मशीन रक्कम दाखविते; परंतु सध्या ई-पॉसमशीन ही रक्कम दाखवीत नाही. सात ते आठ वेळा प्रयत्न केल्यानंतर रक्कम दर्शवीत नाही. त्यामुळे धान्य वाटप करणे शक्य नाही.
यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे महिन्याच्या अखेरीस धान्य घेण्यासाठी येणाऱ्या अनेक शिधापत्रिका धारकांना धान्य न घेताच परत जावे लागत आहे. ई-पॉस मशीन अनेक दिवसांपासून सक्षमपणे कार्य करीत नसल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी-२०२२ चे नियमित आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे नियमित आणि मागील धान्य वितरण करण्यात अडचणी आहेत. सतत येणाऱ्या तांत्रिक समस्यामुळे धान्याचे ऑनलाईन वितरण होत नाही. यामुळे गेली तीन ते चार दिवस नागरिक कामाचा खडा करून रेशनिंग दुकानात धान्यासाठी उभे राहत असल्याने दोन्ही बाजूने उपाशी मरण्याची वेळी आली आहे.