पुणे : पंधरा ऑगस्टपासून राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्र येथे माेफत आराेग्यविषयक उपचार सूरू झाले. त्याचा सकारातत्मक परिणामही झाला असून आता रुग्णांची संख्या जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे, औंध जिल्हा रुग्णालयात सरासरीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी उपचार घेतले. तसेच रुग्णांना दाखल करण्यासाठी जागाही कमी पडत आहे.
जिल्हा रुग्णालय हे औंध येथे असून तेथे उपचारासाठी ३०० बेड आहेत. या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचे उपचार हाेतात. राज्य शासनाने १५ ऑगस्टला सर्वच ठिकाणी माेफत उपचार केल्यामुळे आता या रुग्णालयाकडेही नागरिकांचा ओढा वाढला आहे. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळातच सरासरी रुग्णांच्या तुलनेत ६ हजार १८० अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यामध्ये बाहयरुग्ण विभागापासून आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली असल्याचे जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
जिल्हा रुग्णालयात यावर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान १ लाख ७२ हजार २३० रुग्णांनी ओपीडी म्हणजे बाहयरुग्ण विभागात उपचार घेतले. म्हणजेच सरासरी महिन्याला येथे २४ हजार ४६१ रुग्णांवर उपचार हाेतात. परंतू, एकटया ऑगस्ट महिन्यात येथे ३० हजार ६४० रुग्णांवर उपचार झालेआहेत अशी माहीती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.
काेणते विभाग आहेत-
जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य, मेडिसिन, सर्जरी, पेडियाट्रिक म्हणजे बालराेग, प्रसूती, स्त्रीराेग, अस्थिराेग, टीबी, कान नाक घसा, त्वचाराेग, दात, डाेळे, मानसिक, कुत्रयांचा चावे, आयुष, डायलेसिस आणि तातडीचे उपचार असे रुग्णांच्या आजारानुसार उपचार करणारे विभाग आहेत. या विभागात सर्वाधिक रुग्णांनी उपचार घेतले. जानेवारीत २५ हजार, फेब्रुवारी - २३ हजार, मार्च आणि एप्रिल प्रत्येकी २२ हजार, मे २७ हजार जुनमध्ये २४ आणि जुलैमध्ये २६ हजार रुग्णांनी उपचार घेतले. तर एकटया ऑगस्टमध्ये ३० हजारांहून अधिक उपचार झाले.