पुणे : नवीन शैक्षणिक धोरण मानवाला परिपूर्ण करणारे आहे. याअंतर्गत जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्यात येत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. चार वर्षांची पदवी व अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. या बदलामुळे प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्राचे उच्च व तंंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित २७ व्या ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. मोहन केशव फडके हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व प्रा. दत्ता दंडगे उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. मोहन केशव फडके लिखित ‘वैदिक मंत्रा फॉर द डिसिज फ्री लाइफ’ या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांच्या मनात खूप भीती निर्माण झाली आहे; पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कामाचा लाेड वाढणार नाही किंवा कमी पण होणार नाही, तसेच त्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. प्राध्यापकांची भर्ती ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता राज्यात नव्या ऑर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही.’