पुणे : मालमत्तेवरुन त्या सासु सुनेत वाद होता़. सासू मुलीकडे गेल्याची संधी साधून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला़ त्याच्यावर स्वत:च्या नावाचा फलक लावला़. घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे़
याप्रकरणी हडपसर येथील गाडीतळजवळ राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २६ वर्षाच्या सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १९ ते २३ जुलै दरम्यान घडला़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची सुन यांच्यात मालमत्तेवरुन वाद आहे. फिर्यादी या लहान मुलीसोबत त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन घराचा दरवाजा बदलला. त्याच्यावर तिने स्वत:च्या नावाचा फलक लावला. घरातील लोखंडी कपाटातील ९ तोळे ३ग्रॅम सोने, ५७० ग्रॅम चांदीचे दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सासुच्या तक्रारीनुसार सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.