पुणे: दोन-चार दिवसांपूर्वी हजारो कोटी रूपयांचे ड्रग्ज पुणे पोलीसांनी पकडले. त्यानंतर रविवारी सकाळी ‘एआरएआय’ टेकडीवर दोन मुली नशेच्या अवस्थे आढळून आल्या. त्यांचा एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा टेकडीवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याविषयावर ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. टेकडीवर सायंकाळनंतर अनेकजण दारू पितात आणि गोंधळ घालतात. यावर आता पोलीस आणि वन विभागाने कठोर पाऊले उचलणे आवश्यक बनले आहे.
शहरातील टेकड्यांवर सर्रासपणे सायंकाळनंतर दारूच्या पाट्या रंगत असतात. सकाळी जेव्हा पुणेकर टेकड्यांवर फिरायला जातात, तेव्हा तिथे पिऊन तर्रर्र झालेले नागरिक पहायला मिळतात. याविषयी स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलीस आणि वन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पोलीस टेकडीवर गस्त घालतात. परंतु, ते पुरेसे नाही. त्यामुळे रविवारी सकाळी आढळूून आलेल्या नशेतील मुलीसारखे प्रकार समोर येतात. आता टेकड्याही दारू पिण्याचे अड्डे बनले आहेत. असेच म्हणावे लागत आहे. रविवारी सकाळी ‘पिट्याभाई’ ऊर्फ रमेश परदेशी हे अभिनेते ‘एआयएआय’ टेकडीवर फिरायल गेले होते. तेव्हा त्यांना एका ठिकाणी दोन नशेत धुंद असलेल्या मुली आढळून आल्या. त्याच ठिकाणी परदेशी यांनी लगेच फेसबुकवर लाइव्ह करून त्या मुलींना दाखवत सर्व प्रकार समोर आणला. त्यांनी पुण्यातील ड्रग्जबाबतही भाष्य केले. त्यानंतर पुण्यातील तरूणाई अशा प्रकारे जर दारू पिऊन, नशा करून टेकड्यांवर पडत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
टेकडीवर दारूच्या नशेत असलेल्या मुलींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. परंतु, त्यानंतर अनेकांनी व्हिडिओमध्ये मुलींचे चेहरे दिसत असल्याने लाइव्ह करणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. अनेकांनी मग व्हिडिओ शेअर करणे बंद केले. परदेशी यांनी देखील फेसबुकवर लाइव्ह केलेला व्हिडिओ डिलिट करून टाकला. त्यांनी संबंधित मुलींना गाडी बोलावून आणि पोलीसांना कळवून योग्य ठिकाणी पाठवले.
‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा टेकडीवर दारू पिले जाते, ड्रग्ज घेतले जातात हा विषय समोर आला आहे. यापूर्वी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जुलै महिन्यात टेकडीवर प्रत्यक्ष जाऊन ‘ग्राऊंड रिपोर्ट’ केला होता. त्यामध्ये ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. या सर्व प्रकारावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर कदाचित हा प्रकार झाला नसता. अशीही चर्चा टेकडीप्रेमींमध्ये आहे.