पुणे : परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसह पालकांवरही प्रचंड दडपण असते. त्यात दहावीची परीक्षा असेल तर विचारता सोय नाही. पाल्याचा अभ्यास, परीक्षा केंद्रावर त्याला वेळेत पोहचवणे, अशी भरपूर धावपळ करत पालक आणि विद्यार्थ्यांची सुरु असते.अशातच रस्त्यावर जर वाहतुक कोंडी निर्माण झाली तर साहजिकच सर्वांचेच धाबे दणाणले जातात. हेच चित्र कोथरूडमधील पौडरोडवर सकाळी अकरा वाजता दहावीच्या पेपरसाठी पोहचताना विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाक झाली. रस्त्यावर वाहने लावूनच पालकांनी परीक्षा केंद्राकडे जोऱ्यात धाव घेतली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि.१) पासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भाषा विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या सत्रात मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी तर दुपारच्या सत्रात द्वितीय व तृतीय भाषेच्या जर्मन, फ्रेंच या विषयांची परीक्षा पार पडली. पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मेट्रो, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शहरातील परीक्षा केंद्रावर पोहचण्यात त्रास होत आहे. शनिवारी सकाळी सुतारदरा आणि किष्किंधानगर परिसरातून येणारी चार चाकी वाहने जवळचा रस्ता म्हणून शिवराय शाळे समोरून ये-जा करतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शनिवारी दहावीच्या पेपरला उपस्थित राहताना विद्यार्थ्यांसह पालकांची उडालेली तारांबळ चिंताजनक होती. प्रत्येकजण जमेल तिथे वाहन उभे करत परीक्षा केंद्राकडे धावत होता. त्यामुळे राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शाळेसमोरील रस्ता परीक्षा कालावधीत बंद करण्याची मागणी मनसे विभाग प्रमुख सुभाष आमले यांनी प्रशासनाला केली आहे
वाहतुक कोंडीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर पोहचताना दमछाक..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:52 PM